धुवांधार पावसाने आदिवासी पट्टा गारठला.भंडारदरा 80% तर निळवंडे 40% भरले. मुळा नदीला पूर.

अकोले. प्रतिनिधी /-
गत तीन दिवसाच्या धुवांधार पावसाने भंडारदरा परिसरातील व हरिचंद्रगड परिसरातील आदिवासी पट्टा चांगलाच गारठला असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ओड्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून भंडारदरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यामुळे भंडारदरा धरण 80 टक्के भरले असून निळवंडे धरणातील पाण्याची आवकही चांगली असून धरणसाठा 40% पर्यंत पोहोचला आहे. हरिचंद्रगड परिसरातही मुळा नदीच्या पाणलोटात धुवाधार पाऊस कोसळत असल्यामुळे मुळा नदीला पूर आला आहे.

एकंदरच कळसुबाई हरिश्चंद्रगड परिसर चांगलाच गारठला असून भात खाचरे तुडुंब भरली आहेत. वाकी धरण भरल्यामुळे कृष्णवंतीला पूर आला असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे.

त्याचबरोबर हायड्रो प्रोजेक्ट मधूनही वीज निर्मिती द्वारे प्रवरा नदी पात्रात पाणी सोडले जात असून ते पाणी निळवंड्याला जाऊन मिळत आहे. एकंदरच आदिवासी पट्टा पावसाने चांगला झोडपून काढला असून कळसुबाई हरिश्चंद्रगड परिसरात डोंगरावरून धों धों कोसळणारे धबधबे सर्वत्र दिसत आहेत तर सर्वत्र ओढयांना पूर आला आहे. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून माणसं आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भंडारदरा परिसरात सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने वन खात्याने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर पर्यटकांनी पाण्यात उतरू नये तसेच धबधब्या खाली शेवाळ आल्याने आंघोळ करू नये. अशे आवाहन करण्यात आले आहे. धरण परिस्थितीवर जलसंपदा खात्याचे अधिकारी लक्ष ठेवून असून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. अगस्ती अमृत न्यूज.अकोले.
