जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे 15 ऑगस्टला न भरलेले भंडारदरा धरण आज अखेर भरले.
- भंडारदरा प्रतिनिधी.

दरवर्षी 15 ऑगस्टला भरणारे भंडारदरा धरण यंदा मात्र 15 ऑगस्टला जलसंपदा खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे भरले नाही. मात्र तीन दिवस चाललेल्या मुसळधार पावसामुळे अखेर 11039 दशलक्ष घनफुट क्षमतेचे ब्रिटिश कालीन धरण आज बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले असून 12 हजार 231 क्युसेक्स क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज पहाटे सहा वाजता धरणातील पाणीसाठा 98.70% झाला होता. म्हणजे धरणात 10900/- दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरणाची लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी स्पिलवे गेट मधून 12296/- क्युसेक्स क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. दुपारी धरण पूर्ण क्षमतेने भरले गेले. त्यामुळे आता धरण भरण्याची चिंता मिटली असून निळवंडे धरणही पूर्ण क्षमतेने सायंकाळपर्यंत भरेल. दरवर्षी 15 ऑगस्ट ला भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरते मात्र हे वर्ष त्यास अपवाद राहिले. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्या मनमानी कारभारामुळे दरवर्षीचा धरण भरण्याचा नियम यावर्षी पायदळी तुडवण्यात आला. प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्याने खालच्या अधिकाऱ्यांना दिले आणि त्याचमुळे यंदा 15 ऑगस्टला धरण पूर्ण क्षमतेने भरले गेले नाही. जलसंपदा खाते पहिल्यांदाच नामदार राधाकृष्ण विखेंच्या रूपाने नगर जिल्ह्याला मिळाल्यानंतर धरण न भरण्याची नामुस्की जलसंपदा खात्यावर ओढवली गेली. कार्यकारी अभियंता यांचा मनमानीपणा या गोष्टीस कारणीभूत दिसून आला. मध्यंतरी जलसंपदा मंत्री भंडारदरा येथे आले असता त्यांनीही कार्यकारी अभियंत्याची चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र सुधारतील ते कार्यकारी अभियंता कसले…

त्यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला. अखेर नियतीने पंधरा दिवस पावसात उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा तीन दिवसापूर्वी भंडारदरा परिसरात व संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरू शकले. धरण पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे 15 ऑगस्टला भंडारदराकडे पर्यटकांनी यावर्षी पाठ फिरवली. परंतु आज अखेर भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात असून परिसरातील वातावरणही अतिशय विहंगमय झाले आहे. पुन्हा एकदा सर्व ओढे नाले प्रवाहीत झाले आहेत. मध्यंतरी पंधरा दिवस भंडारदरा परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यातच आवण्यांची कामे रखडली होती. मात्र आता आवण्यांची कामे पूर्ण झाली असून पावसानेही जोरदार सलामी दिल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे.
-अगस्ती अमृत न्यूज.
(अकोले, संगमनेर)
